प्रशासनिक WhatsApp Group वरून बाहेर पडण्यासह वैताग आणणाऱ्या ऑनलाईन कामासंबंधाने असहकार करण्याचा राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांचा निर्धार...
राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पुण्यातील बैठकीत निर्णय.
⏩
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे दैनंदिन अध्यापन प्रभावित करणाऱ्या ऑनलाईन कामांच्या अतिरेकामुळे मुख्याध्यापक-शिक्षक त्रस्त आहेत. संचमान्यता धोरणाचे दुष्परिणाम, TET संबंधाने शासनाची नकारार्थी भूमिका यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचे अस्तित्व संपवणारे धोरण, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळांच्या अडचणी यासह शिक्षकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
राज्यातील वेगवेगळ्या प्राथमिक शिक्षक संघटनांनी अनेकदा आंदोलने, चर्चा करूनही एकाही प्रश्नाबद्दल शासन गांभीर्याने अनुकूल निर्णय घेत नाही.
या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी एकत्र येत टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याची भूमिका मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी शिक्षक भवन, पुणे येथे झालेल्या बैठकीत घेतली आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना, महाराष्ट्राचे पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक महासंघ, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी व अधिकारी संघटना या संघटनांचे राज्य पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
शिक्षक संघटनांचे नेते संभाजीराव थोरात, उदयराव शिंदे, केशवराव जाधव, कल्याण लवांडे, मधुकर कठोळे, सुनील तेलतुंबडे, नवनाथ गेंड, साजिद निसार अहमद, मनोज मराठे, गोविंद उगले, पुरुषोत्तम जाधव, प्रभाकर पारवे, मिलिंद खंडिझोड, संजय कुर्डुकर, आनंदा कांदळकर, राजन सावंत, नंदकुमार होळकर, संदीप जगताप, परशराम सरदेसाई, पुरुषोत्तम बावणे, बापू खरात, उमेश देशमुख, बाळासाहेब झावरे, हनुमंत शिंदे, सुधीर सगणे, राजेश महाबुधे, महादेव माळवदकर, चंद्रकांत सलवदे, राजेंद्र ठोकळ, सुरेश पवार, डॉ. मनियार मोईनुद्दीन, अमोल माने, विनोद चव्हाण आधी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत शासनाचे दुर्लक्ष लक्षात घेऊन एकत्रित लढा देण्याचा निर्धार केला.
सातत्यपूर्ण लढा देण्यासाठी पुढील काळात कृती कार्यक्रम आखून चळवळ बळकट करण्याचे ठरविण्यात आले.
*शिक्षकांना शिकवू द्या..! विद्यार्थ्यांना शिकू द्या...!!* या मागणीला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. पुढील काळात विविध शिक्षक संघटना, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, पालक संघटना, लोकप्रतिनिधींसह समन्वय साधून लढ्याची पुढील दिशा निश्चित करण्याचे ठरवण्यात आले.
ऑनलाईन कामांच्या अतिरेकामुळे आणि विविध उपक्रम लादण्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षक शिक्षकांना शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक अध्यापन कार्य करीत आहे. मात्र जितका न्याय विद्यार्थ्यांना दिला पाहिजे; तितका न्याय देता येत नाही. अशैक्षणिक कामे न करण्याचा शासनाने निर्णय निर्गत करूनही अनेक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारची अशैक्षणिक कामे थोपवली जात आहे. शाळांमध्ये एनजीओ चा वाढलेला हस्तक्षेप त्रासदायक ठरत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी एकत्र येऊन लढा उभारणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या कामांमुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक त्रस्त झाले आहेत. कथित प्रशासनिक व्हाट्सअप ग्रुप वरील अहोरात्र (वेळी-अवेळी) येणारे संदेश, आदेश आणि ऑनलाईन कामाच्या ससेमिऱ्यामुळे शिक्षक प्रचंड हैराण झाले आहे. दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारे व शिक्षकांची मनस्थिती खराब करणारी ऑनलाईन कामे १ डिसेंबर २०२६ कोणत्याही शिक्षकाने करू नये तसेच तथाकथित सर्व प्रशासनिक व्हाट्सअप ग्रुप वरून शिक्षकांनी बाहेर पडावे अशाप्रकारे असहकार पुकारण्याचा निर्णय सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला .
आपले नम्र
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समन्वय समिती
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment