शिक्षण मंत्री मा. श्री. दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
दि. १४ जुलै २०२६
आज दि. १४ जुलै २०२६ रोजी शिक्षकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मा. शालेय शिक्षण मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांच्या दालनात महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीस शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, मा. श्री. विक्रम काळे व मा. श्री. सुधाकर अडबाळे उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत:
१) पदोन्नतीबाबत :
शालेय शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडे अभिप्रायासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय प्राप्त झाला असून त्यानुसार शालेय शिक्षण विभाग निर्णय घेणार आहे.
नागपूर खंडपीठाच्या निर्णयाच्या अनुषंगाने पदोन्नती प्रक्रिया राबविण्याच्या तारखेपर्यंत TET/CTET पात्रता प्राप्त केलेले सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीस पात्र राहतील, अशी भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.
कोल्हापूर खंडपीठाचा निर्णयही प्राप्त झाला असून त्याचाही विचार करून शासन अंतिम निर्णय घेणार आहे.
२) TET परीक्षेबाबत :
महाराष्ट्र शासन कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र TET परीक्षा आयोजित करणार आहे.
३) यापूर्वी झालेल्या पदोन्नतीबाबत :
यापूर्वी झालेल्या सर्व पदोन्नती प्रकरणांबाबत न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन राहून शासन योग्य निर्णय घेणार आहे.
४) एक दिवसाच्या पगार कपातीबाबत :
एकदिवसीय धरणे आंदोलनामुळे झालेल्या शैक्षणिक नुकसानाची भरपाई अतिरिक्त अध्यापनाद्वारे करण्यात येणार असल्याने कोणत्याही शिक्षकाचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येणार नाही, याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
५) पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी :
पदवीधर विषय शिक्षकांना सरसकट वेतनश्रेणी देण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून शासन निर्णय घेणार आहे.
६) आंतरजिल्हा बदली :
पवित्र पोर्टलमधून नियुक्त शिक्षकांच्या नियुक्तीपूर्वी आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी संघटनांची मागणी करण्यात आली.
SIR चे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकतेनुसार संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत शालेय शिक्षण व ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मंत्री महोदयांनी सांगितले.
७) BLO / SIR कामकाज :
BLO व SIR कामादरम्यान काही अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मनमानी, तसेच शिक्षकांना होत असलेल्या त्रासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या संदर्भात मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत बावनकुळे, निवडणूक आयोग आणि शिक्षक आमदार यांच्या उपस्थितीत पुढील मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये आवश्यक निर्णय घेतले जातील.
शिक्षकांना BLO/SIR ची कामे देऊ नयेत, या भूमिकेवर सर्व शिक्षक संघटना ठाम असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
*सदर बैठकीसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे संयुक्त सचिव श्रीकृष्ण चिकणे तसेच रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद जोशी यांची उपस्थिती होती..*

No comments:
Post a Comment