टीईटी सक्ती संदर्भात श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ, सातारा जिल्हा शाखेच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरातील कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या जिव्हाळ्याच्या टीईटी सक्तीच्या प्रश्नासंदर्भात लोकसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेने निवेदनाद्वारे आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या सक्तीमधून कायमस्वरूपी सूट देण्याची मागणी केली. तसेच टीईटी परीक्षेतील किमान पात्रता गुणांची अट ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात यावी, अशीही प्रमुख मागणी करण्यात आली.
संघटनेच्या मते, आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी राज्य शासनाच्या नियमानुसार नियुक्त झालेल्या हजारो शिक्षकांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन कार्य केले असून, नव्या अटींची पूर्वलक्षी अंमलबजावणी केल्यामुळे त्यांच्या सेवासातत्यावर व भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांच्या शैक्षणिक कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी टीईटी सक्तीच्या विषयावर वैयक्तिक चर्चा करून शिक्षकांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष श्री दीपक भुजबळ, राज्य संघटक श्री संतोष लोहार, जिल्हाध्यक्ष श्री गणेश जाधव, उपाध्यक्ष श्री विजय भुजबळ, जिल्हा सरचिटणीस श्री बसवराज दोडमनी तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment