*कर्तुत्वाने व नेत्रदानाने अजरामर झालेल्या तेजस्वी स्व. सुनिताताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली*
अखिल अमरावती महिला जिल्हा संघाच्या आधारस्तंभ कित्येक महिला शिक्षिकांच्या प्रेरणास्त्रोत,अखिल परिवारातील एक हसतमुख कार्यमग्न व्यक्तिमत्व सुनीता किरण पाटील. अकस्मात अपघाताचे निमित्त घडून अखिल परिवाराला कायमचा सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. जीवनाच्या वाटेवरून निघून जातानाही आपले नेत्रदान करून कुण्यातरी व्यक्तीला जग दाखविण्याचं सामर्थ्य देऊन गेल्या. जग सोडून जाताना आपले अवयव इतरांना देऊन, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, ही त्यांची विचारसरणी.अवयवदान करण्याची पायाभरणी त्यांनी आधीच केलेली होती.पती श्री किरणजी पाटील,मुलगी तनुजा पाटील व इतर कुटुंबातील सदस्यांसोबत अवयवदानाबद्दल त्यांनी यापूर्वीच चर्चा करून निर्णय घेतलेला होता.या निर्णयाची अंमलबजावणी अतिशय कठीण प्रसंगात असामान्य धैर्य दाखवून पाटील कुटुंबीयांनी पूर्णत्वास नेऊन स्व. सुनीताताईंना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.
अमरावती जिल्हा संघाच्या संघटनेच्या जडणघडणीत ज्या शिक्षकांचा वाटा आहे, त्यामध्ये महिला शिक्षकांमधून सुनिता ताईंचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण जिल्ह्याभर अखिल परिवाराचे जाळे अमूल्य योगदान आहे.संघटनेचा कोणताही कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या नियोजनात स्व. सुनीताताईंचा सहभाग नाही,असं कधी घडलं नाही. स्टेजची तयारी असो,स्वागताचा कार्यक्रम असो,कार्यक्रमात त्यांनी आपली यशस्वी भूमिका व कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडले.संघ परिवार त्यांचेही अभूतपूर्व कार्य कधीही विसरू शकणार नाही. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांची उपस्थिती ही प्रकर्षाने राहायची. अनेक महिला व त्यांच्या कुटुंबांना घेऊन संपूर्ण भारतभर कित्येक यशस्वी प्रवासाचे नियोजन त्यांनी पार पाडले. सहकाऱ्यांना कठीण प्रसंगी मदत करून त्यांची समस्या सोडविण्यात ताईंचा वाटा आहे.
प्राथमिक शिक्षिका म्हणून स्व.सुनीताताईंचा प्रवास सुरू झाला. एक आदर्श उपक्रमशील शिक्षिका व शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी लढणारी एक रणरागिणी हे दोन्ही रूपे पाहावयास मिळाली. चिखलदरा सारख्या दुर्गम भागातून त्यांनी सेवेची सुरुवात केली, त्यानंतर पदवीधर शिक्षिका म्हणून त्यांनी कार्य केले. क्रीडा महोत्सवामध्ये प्रत्येक वर्षी त्यांनी टेनीक्वाईटच्या अंतिम किंवा उपविजेते हमखास ठरलेलं पारितोषिक त्यांच्या नावावर असायचं.यामध्ये सातत्य होते.कधीच खंड पडला नाही. खेळण्याची त्यांना प्रचंड आवड होती आणि हीच खेळाडूवृत्ती त्यांनी जीवनामध्ये उपयोगात आणली.संपूर्ण कुटुंबात प्रसन्न वातावरण तयार करून श्री. किरणजी पाटील यांना समर्थपणे साथ दिली.ताईंच्या अनेक आठवणी अखिल परिवारातील अनेकांना सोबत जोडलेल्या आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या नेत्या स्व. सुलभाताई दोंदे यांचा अमरावतीमधील मुक्काम सुनीता ताईंच्याच घरी असायचा. ताईमुळे मी आज शिक्षक आहे, हे आवर्जून श्री अमोलजी आखाडे सर सांगतात; नाहीतर मी एक मवाली म्हणूनच राहिलो असतो, हे ते स्वतः सांगतात. स्व . चंदनजी खर्चान सर यांच्या आजारांवर उपचारांसाठी श्री किरणजी पाटील सरांनी घेतलेल्या निणर्याच सुनिता ताईनी समर्थन करून खंबीर पाठिंबा दिला .ताईंचे अकस्मात निघून जाणे अखिल अमरावती जिल्हा संघासाठी फार मोठी हानी आहे. ही पोकळी भरून येणे अशक्य आहे. नियती पुढे मनुष्याचे काही एक चालत नाही. मिळालेलं आयुष्य तुम्ही कशाप्रकारे जगलंत, यावरच तुमचं मूल्यमापन होतं. ताईंच्या या आयुष्याचं मूल्यमापन करताना हेच करावं लागेल,संघटनेसाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ताई एक समर्पित व्यक्तिमत्व होत्या.
सासू आणि आईमध्ये फरक न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सुनीता ताई पाटील. सासूचा धुमधडाक्यात अमृत महोत्सव साजरा करणारी, सुनेचं पूर्ण कर्तव्य पार पाडणारी सुनीता ताई एक अनोखं व्यक्तिमत्त्व होतं.
सुनीता ताईंचं अचानक निघून जाणं हे अनाकलनीय आहे. ताईंच्या बाबतीत 'जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला' हेच वाक्य लागू पडते. अखिल अमरावती जिल्हा संघ परिवाराकडून ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.
✒️ सुभाष सहारे, जिल्हा सरचिटणीस अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा अमरावती
🟰🟰🟰🟰🟰🟰
No comments:
Post a Comment